RSS

गुरुवाणी- १ (मराठी)— प्रवचन

14 जनवरी

मी जिथे कुठे जाते , लोक विचारतात-“आपण प्रवचन करीत नाही का? आशीर्वादपर दोन शब्द देखील नाही का सांगणार?” माझ्या मनात विचार येतो-‘लोकांना प्रवचन इतके का आवडते?’ जिथे कुठे उत्सव असतो, आध्यात्मिक स्वरूपाचा कार्यक्रम असतो सर्वत्र केवळ भाषणेच भाषणे आढळतात.

सद्गुरुंकडून प्राप्त होणार्‍या संकेतांच्या आधारे मी सांगू शकते- ज्ञानाची परिपूर्ती बाह्य साधनांनी देखील होऊ शकते आणि ते आत देखील प्रगट केले जाऊ शकते. बाह्य उपचारांमधे ‘प्रवचन’, ‘श्रवण’ आदींचा समावेश होतो. तर आंतरिक साधनांमधे  ध्यान,  धारणा इत्यादींचा उल्लेख सापडतो. बाह्य साधनांनी प्राप्त होणारे ज्ञान हे काहीसे उधारीचे किंबहुना वरवरचे ज्ञान आहे. तर आंतरिक साधनांनी प्राप्त होणारे ज्ञान ही वैयक्तिक संपत्ती आहे, अर्थात हे सांगण्याची गरजच नाही की कोणत्या प्रकारचे ज्ञान हे कायमस्वरूपी टिकणारे (नित्य) आणि स्वयंप्रज्ञ आहे.

ईश्वर तत्त्वाचा अनुभव घेण्याचे, त्याच्या समीप जाण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यापैकी श्रेष्ठ मार्ग ‘ध्यान’ हाच आहे. ध्यान करणारा ‘मुनी’ असतो (मुनि: मननात् |) अशा अर्थाने की तो ‘मौन’ पाळतो. ध्यान करणारा ‘योगी’ ठरतो, कारण ईश्वर तत्त्वाशी ‘योग’ (संयोग) करण्याची पात्रता त्याच्या ठिकाणी येते. ध्यान करणारा ‘साधक’ असतो, कारण ज्याला प्राप्त केल्याने परमानंदाची अनुभूती येते ते ईश्वर तत्त्व हेच त्याचे ‘साध्य’ असते आणि ते तो मिळवतो. (साध्य-साधक-साधन सारे जिथे लय पावते तोच साक्षात्कार ! ) प्रवचन हा बोलण्याचा विषय आहे, तर ध्यान हा करण्याचा विषय आहे.प्रवचनात बाह्यसाक्ष्य आहे, तर ध्यानात अंतर्सा़क्ष्य आहे. प्रवचनात द्वैताचा स्वीकार आहे तर ध्यानात अद्वैताची स्वीकृती आणि अनुभूती आहे.

मला प्रवचनकारांचे वावडे नाही, की तक्रारही नाही. किंवा माझेच विचार दुसर्‍यावर लादण्याची इच्छादेखील नाही. प्रवचनाच्या परंपरेला नाकारणं किंवा तिचं महत्त्व कमी ठरवणं हादेखील उद्देश नाही. विशिष्ट स्थिती निर्माण करणं वा विशिष्ट भावावस्था निर्माण होणं इथपर्यंत प्रवचनाचे महत्त्व आहे हे नि:संशय! परंतु पुढचा प्रवास तर ध्यानमार्गानेच होईल. प्रवचनामधे रममाण होऊन त्यातून भक्तिरसाचा परिपोष त्याच व्यक्तीच्या मनात होईल, ज्याचा मनाचा भक्ती हा स्थायीभाव आहे. प्रवचनाचं मर्म तेच लोक जाणतात ज्यांचं मन भक्तिरसाचा आस्वाद घेण्यास तत्पर आहे. बाकीची मंडळी त्या कथेच्या शक्याशक्यतेबद्दल तर्क करीत बसतात, आणि मंतव्य (मूळ मुद्दा) हरवून बसतात. ज्ञानगंगेमधे स्नान करणारे अनेक लोक शेकडो ज्ञानयज्ञांनंतरही कोरडे पाषाण  असल्याचे   दृष्टोत्पत्तीस येते. कारण मन एकाग्रच झाले नाही.

माझे गुरुदेव सांगत ईश्वराची प्राप्ती करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यांनी आम्हाला जो मार्ग दाखविला, दीक्षा दिली ती शक्तिपात साधनेची. याच्या मुळाशी ध्यान आहे. ध्यान आणि नामजप यांची एकत्र सांगड या मार्गात घातली जाते. प्रवचनाचा उल्लेखही नाही. त्यांनी स्वतःदेखील आयुष्यात कधी फारसे प्रवचन केले नाही. त्यांनी हजारो साधकांना ध्यानमार्गाचे वाटसरू म्हणून तयार केले, अंतिम गन्तव्यापर्यंत पोहोचण्याची क्षमता दिली. कित्येक तास प्रवचन ऐकून जे ज्ञान मिळत नाही, ते परमहंसांच्या जवळ केवळ मौन धारण करून बसले असता वा त्यांनी सांगितलेल्या मार्गाने ध्यानधारणा केली असता होते . (गुरोsस्तु मौनं व्याख्यानं शिष्यास्तु छिन्नसंशया:|)   हजारो शब्द जो साक्षात्कार करू शकत नाहीत तो अनुभव नि:शब्द ध्यानाद्वारे, सदुरूच्या एका कृपाकटाक्षामुळे आपल्या पदरी पडतो. मौनाची भाषा समजून घेणे हे ईश्वरप्राप्तीजवळ घेऊन जाणारे निर्णायक पाऊल ठरते.

दत्त परंपरेमधे आजवर जितके संत होऊन गेले जसे ज्ञानेश्वर, गजानन महाराज, माणिक प्रभु, स्वामी समर्थ,  साई बाबा, रामकृष्ण परमहंस यांनी काही प्रवचने देऊन स्वत:ला सिद्ध केलेले नाही. आपल्या अनुयायांना अनुभूती  देत ईश्वरीय शक्तीने साक्षात्कार घडविले आहेत. मी पुन्हा हे स्पष्ट करू इच्छिते की , याचा अर्थ असा अजिबात नाही , की प्रवचन हे महत्त्वाचे नाहीच. असाही अर्थ नव्हे की प्रवचनकार संत आणि ध्यान-धारणा करणारे संत यांच्यात काही गुणात्मक भेद असतो. महापुरुषांमधे  भाषण करावे वा करू नये याबद्दल मतभेद कधीच नव्हते. कारण ते जेव्हा केव्हा प्रवचन करीत तेव्हा ते अनुभवसिद्ध असे. किंबहुना प्रवचन करणार्‍या संतपरंपरेचा आपण विचार केला तर नेहमीच असे जाणवते की त्यांनी आधी स्वतः अनुभव घेतला आणि मग आनंदाने त्याचे गुणगान केले. त्यानी केलेला गौरव कुणी ऐकावा म्हणून नव्हता आणि कुणाला प्रभावित करण्याच्या उद्देशाने केलेला देखील नव्हता. ब्रह्मानंदरसात रममाण झालेले संतसज्जन स्वांतसुखाय रचना करीत होते. त्यातून कुणी लाभ घेतला आणि कोण त्याला मुकला याची त्याना जाणीवही नव्हती. आजही अशा प्रकारची प्रवचने प्रेरक ठरत आहेत. परंतु जेव्हा केव्हा एखाद्याने परमात्त्व तत्त्वाचा अनुभव घेतला तेव्हा तेव्हा ती व्यक्ती ध्यानस्थ आणि मौनावस्थेत गेलेली दिसते.

हे नेहमीच ध्यानात असू द्या की ईश्वरप्राप्ती चर्चा, विवाद, चेष्टामस्करी, द्वेष, मत्सर किंवा ज्ञानाभिमानाने होत नाही. त्यासाठी निरंतर साधना, ध्यान, प्रेम, चिंतन यांचीच गरज आहे. साधकासाठी गुरुने सांगितलेल्या गोष्टीशिवाय दुसरे काहीही सत्य नाही,  जगाची काळजी सोडून देऊन गुरुच्या मनात स्वतःचे उच्च स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करणे ही ध्यानाची सुरुवात आहे आणि ध्यानाद्वारे या ईश्वरतत्त्वाची प्राप्ती नक्कीच होते.

परमपूज्य प्रभु बा यांनी केलेला उपदेश शिवसुगंध या त्रिवार्षिक अंकात २००७ साली प्रसिद्ध झाला. मूळ आशीर्वाद हिंदी भाषेत आहेत. त्यांचा हा स्वैर अनुवाद!

साधनचतुष्टयाची संकल्पना अत्यंत प्रासादिक शब्दात येथे मांडली आहे. त्याची अधिक माहिती येथे पहा.

भाषांतर-श्रेया महाजन.

back to सद्गुरुसंदेश
back to Guruvanee
Advertisements
 

टैग: ,

5 responses to “गुरुवाणी- १ (मराठी)— प्रवचन

 1. Rucha Rajesh Phatak

  फ़रवरी 5, 2012 at 6:15 पूर्वाह्न

  श्री गुरुदेव दत्त.
  आपली वेब साईट पाहिली
  मनाची एकाग्रता कशी करावी आणि साधन मार्गात प्रगती साठी माझे सद्गुरू श्री परम पूज्य श्री दत्त महाराज कवीश्वर यांचे चरणी संपूर्ण शरणागती कशी करावी ?
  हे आपण मार्गदर्शन करावे… हि आपल्या चरणी नम्र प्रार्थना
  आपली कृपाभिलाषी
  ऋचा फाटक
  GOA

   
 2. विशालसिंग परदेशी

  मई 20, 2011 at 12:18 पूर्वाह्न

  अर्थपूर्ण, परिपूर्ण!

   
 3. rani gadre

  जनवरी 16, 2011 at 7:39 पूर्वाह्न

  Uttam ! hi satguru sewach aahe !

   
 4. Raj

  जनवरी 15, 2011 at 5:03 पूर्वाह्न

  Khupach Chan..Punha Punha ya goshti vachavayas milavyat,jyayoge Bhagwan aamchya satat jawal raho..AAbhar

   

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: